•
१० मिनिटे वाचन
श्री काळाराम मंदिर इतिहास
गिरगांव-ठाकुरद्वार (मुंबई) येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिराचे संस्थापक महंत आत्मारामबुवा रामदासी

श्रीरामपंचायतन, श्रीव्यंकटेश व कैलास भुवन
नम्र निवेदन
ह्या मंदिराचा इतिहास सन १९६२ साली संपादक अनंत वासुदेव मराठे यांनी लिहून प्रसिद्ध केलेला मंदिराकडे प्राप्त असलेली प्रत जीर्ण झालेली असल्याने तसेच काही भाविकांकडून आणि जिज्ञासुकडून माहिती पुस्तकेविषयी सतत विचारणा होत होती. त्यासाठी मंदिराची उपलब्ध पुस्तिकातील छापील चुका दुरुस्त करून मुळ मजकूर तसाच ठेवण्यात आला आहे.
ठाकुरद्वार पूर्वइतिहास
प्रास्ताविक
सन १८२८ ची गोष्ट. आज मुंबईतील गिरगांवच्या बाजूला ‘गिरगांव रोड’ किंवा हल्लीं ‘नाना शंकर रस्ता’ ह्या प्रशस्त रस्त्यावर ‘ठाकुरद्वार’ हा जो अत्यंत गजबजलेला भाग दिसतो तो त्या वेळीं जवळजवळ मोकळाच होता. तिथे मुख्यतः पाठारे प्रभु समाजांतील कांहीं प्रतिष्ठित घराण्यांची वस्ती होती. आणि तो बहुतेक भाग त्यांच्याच मालकीचा होता.
ठाकुरद्वार हैं नांव त्या वेळीं होतें कीं नाहीं समजत नाहीं. ‘गिरगांव रोड’ हैं नांवही त्या वेळीं नव्हतें. त्या वेळचें नांव ‘पालवा रोड’ असें होतें. ‘ठाकुरद्वार’ म्हणजे देवालयांचा परिसर हें नांव तिथे देवालयांची उभारणी झाल्यावर पडलें असावें. ह्या देवालयांच्या परिसरांत आज ‘काळाराम मंदिर’ किंवा ‘आत्मारामबुवांचें राममंदिर’ आणि ‘गोराराम मंदिर’ हीं देवस्थानें फार प्रसिद्ध आहेत.
महत्त्वाचे कालखंड
संपूर्ण चरित्र व वृत्तांत
इतिहास प्रकरणे
कोकणांतील बाल आत्माराम
महाराष्ट्रांतील कोकण प्रांत हा पूर्वीपासून द्रव्यदृष्ट्या गरीब असला तरी बुद्धिमत्तेंत श्रेष्ठत्व पावलेला आहे. राजकारणी, मुत्सद्दी व विद्वान् देशभक्त यांप्रमाणेंच संत व सत्पुरुष यांची मालिकाही ह्या भूमींत सतत चालली होती.
दक्षिण कोकणांतील विजयदुर्ग-राजापूरच्या बाजूला ‘वासिष्ठ गोत्री’ पळसुले या उपनांवाचीं कांहीं कऱ्हाडे ब्राह्मणांचीं कुटुंबें आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १७४६ च्या सुमारास) आत्माराम नांवाचा एक मुलगा तिथल्या एका गरीब पण सात्त्विक कुटुंबांत जन्मला.
श्रीशंकराचार्य आणि रामदास
हा रामदासी सांप्रदाय महाराष्ट्रांतील एक प्रमुख सांप्रदाय आहे आणि त्याची स्थापना सतराव्या शतकांत समर्थ श्रीरामदासस्वामींनीं केलेली आहे. इ. सनाच्या सातव्या शतकांत आद्य श्रीशंकराचार्यांनीं वैदिक धर्माच्या पुनः प्रस्थापनेचें जें कार्य केलें तशाच प्रकारचें कार्य सतराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदासस्वामींनीं केलें. श्रीशंकराचार्यांना त्या वेळच्या बौद्ध सांप्रदायाला तोंड देऊन आणि वैदिक धर्मात शिरलेले दोष काढून टाकून त्याला नवीन तजेला द्यावयाचा होता.
श्रीरामदासस्वामींनीं महाराष्ट्रांत केलेलें कार्य याच स्वरूपाचें होतें. श्रीज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, इत्यादि त्यांच्या पूर्वीच्या संत मंडळींनीं महाराष्ट्रांत ज्या ‘भागवत धर्मा’चा प्रसार केला होता त्यांतील कांहीं तत्त्वें बौद्धांच्या तत्त्वांप्रमाणेंच होतीं. ‘प्रवृत्ति’ व ‘निवृत्ति’ या धर्माचारांच्या पूर्वापार चालत आलेल्या दोन मार्गापैकीं निवृत्तीला प्रथम श्रेणीचा मान द्यावयाचा हें उघडच आहे.
श्रीरामदासांचें वैशिष्टय आणि महाराष्ट्रधर्म
श्रीरामदासस्वामींनीं पाहिलें कीं साऱ्या जनतेनेंच हा निवृत्तिमार्ग स्वीकारला तर आपलें प्राचीन भारत राष्ट्र काय किंवा महाराष्ट्र काय जगांतून नष्टच झाल्यासारखें होईल! तेव्हां त्यांना ‘प्रवृत्ति’ व ‘निवृत्ति’ या दोन सनातन तत्त्वांची ज्यांत योग्य सांगड घातलेली आहे असा धर्म शिकविला पाहिजे.
तात्पर्य, धर्म आणि व्यवहार यांची यथायोग्य सांगड हा या धर्माचा विशेष आहे आणि तो स्वामींनीं “प्रपंच सोडूनि परमार्थ कराल । तेणें तुम्हीं कष्टी व्हाल ।। प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी।।” ह्या शब्दांत स्पष्ट केला आहे.
छत्रपति, समर्थ आणि शिरगांव मठ
‘छत्रपति’ नि ‘समर्थ’ म्हणजे शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांचें कार्य परस्परांना पोषक होऊन महाराष्ट्रांत स्वराज्याची स्थापना झाली हैं इतिहासज्ञांना माहीत आहेच. श्रीसमर्थांनीं या महाराष्ट्रधर्माच्या प्रसारासाठीं ठिकठिकाणीं मठ स्थापन केले होते.
या मठांपैकींच शिरगांव येथील मठ हा एकोणिसाव्या शतकांतील एक प्रसिद्ध मठ होता. हा मठ चाफळपासून दोन कोसांवर आहे. कल्याणस्वामी, त्यांचे बंधु दत्तात्रेयस्वामी व मातुःश्री असे त्रिवर्ग प्रथम याच मठांत राहत असत. दत्तात्रेयस्वामींची समाधि शिरगांव मठांतच आहे. प्रस्तुत चरित्रनायक श्रीआत्मारामबुवा हे या शिरगांव मठाचेच सांप्रदायी होते.
देशपर्यटन आणि श्रीशंकराचा दृष्टान्त
आत्मारामबुवांनी वैयक्तिक संसारांत गुरफटून न राहतां भरतखंडभर प्रवास केला. या प्रवासांत काशीक्षेत्रीं असतां त्यांना एक स्फटिकाचें शिवलिंग सांपडलें. तें त्यांनीं बरोबर घेतलें आणि काशीयात्रेहून आल्यावर सावंतवाडीला त्यांच्या भाच्याकडे आले.
“मी इथल्या नजीकच्या वाण्याच्या घरीं त्याच्या पाट्यावर आहें. रोज माझा मिरच्या वाटण्यासाठीं उपयोग होत आहे, त्यामुळे माझ्या अंगाची आग होत असते. तेव्हां तूं मला तिथून नेऊन कुठें तरी सुस्थळीं ठेव !”
सकाळीं उठल्यावर त्यांनीं आसपास चौकशी केली तेव्हां त्या वाण्याच्या घरच्या पाट्यावर असलेला वरवंटा रात्रौ स्वप्नांत पाहिलेल्यासारखाच आढळला. त्यांनीं तो वरवंटा मागून घेतला आणि स्वच्छ धुवून पुसून सावंतवाडीला आणले.
सावंतवाडी, आत्मेश्वर व रामतीर्थ
आत्मारामबुवा सावंतवाडीला आले तेव्हां तिसरे खेमसावंत ऊर्फ ‘राजश्री’ हे अधिपति होते. त्यांनी ‘माठेवाडा’ नामक विभागांत प्रशस्त मोकळी जागा पसंत करून तिथं त्या लिंगाची ‘आत्मेश्वर’ या नांवानें स्थापना करविली. काशीहून आणलेल्या लिंगाला ‘प्राणेश्वर’ नांव देण्यांत आलें (सन १७९९).
आत्मेश्वराच्या या देवालयापुढें ‘रामतीर्थ’ नांवाचें शुभ्र गंगोदकासारख्या पाण्याचें उदककुंड निर्माण झालें (आत्मेश्वराची तळी). तिचा विशेष असा कीं बाराही महिने पाणी भरलेलें असतें; कितीही उपसा केला तरी अल्पावधींत भरून राहतें.
मुंबईत आगमन, भाऊ रसूल व काळाराम मंदिर
१८२८ च्या सुमारास बुवा मुंबईत आले. त्या वेळीं गिरगांव ठाकुरद्वार परिसर मोकळा होता, एक पुष्करिणी असून जागा पाठारे प्रभु कुटुंबांच्या मालकीची होती. मुंबईचे प्रसिद्ध धनिक व उदार अंतःकरणाचे समाजसेवक भाऊ रसूल (ज्यांच्यावरून भाऊचा धक्का हे नाव पडले) हे बुवांचे शिष्य बनले.
भाऊंच्या मदतीनें देणग्या मिळवून त्या वेळच्या ‘पालवा रोड’ नजीक जागा खरेदी केली व मंदिर उभारलें. भाद्रपद शु. १२ शके १७५० (२० सप्टेंबर १८२८) रोजी श्रीरामपंचायतनाची विधिपूर्वक स्थापना झाली.
घुमटींतील श्रीशिवलिंग (कैलास भुवन)
या मंदिराच्या घुमटींत एक शिवलिंग आहे. तें खालच्या श्रीरामाच्या मूर्तीच्या मस्तकाच्या बरोबर वरच्या बाजूला आहे. आत्मारामबुवा तिथे ध्यानस्थ बसत असत. त्याला ‘कैलास भुवन’ असें म्हणतात. श्रावण महिन्यांतील सोमवार, वैकुंठ चतुर्दशी नि माघी शिवरात्र या दिवशीं भक्तमंडळीला तिथे दर्शनाचा लाभ मिळतो.
समाधि, श्रीदत्तमंदिर व हायकोर्टाची नवी योजना
श्रावण वद्य ७ शके १७५८ (२ सप्टेंबर १८३६) रोजी बुवांनीं राममंदिराच्या आवारांत समाधि घेतली. सन १८७० च्या सुमारास बापूबुवा ऊर्फ कृष्णनाथबुवा यांनी श्रीदत्तमंदिर स्थापन करून श्रीअक्कलकोटस्वामींच्या पादुका, विठोबा-रखुमाई, देवी, गणपती व शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली.
पुढें मुंबई हायकोर्टामार्फत मंदिरासाठीं एक कायमस्वरूपी ‘स्कीम’ (विश्वस्त योजना) ठरविण्यांत आली, ज्यानुसार आजही व्यवस्था अत्यंत सुव्यवस्थित आणि पारदर्शक रीतीने चालू आहे.
देवस्थानातील प्रमुख उत्सव
चैत्र शु. ११ च्या दिवशी श्रींची पालखी विश्वस्त व इतर भक्तांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी जाते व तिथे आरती-प्रसाद कीर्तन सोहळा संपन्न होतो.
“मुंबईत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांविषयीं जीं मंदिरें प्रसिद्ध आहेत त्यांत या मंदिराची गणना होत असून चातुर्मास, पुराणकीर्तने यांद्वारे संस्कृतीची ज्योत निरंतर तेवत ठेवली जात आहे.”
